वसगडे ग्राम पंचायत

वसगडे हे येराळा काठी वसलेले व शेतीने समृध्द असलेले गाव आहे. पूर्वी या गावाचे नाव वसंतपूर असे होते. या वसंतपूर गावामध्ये जैन मराठा मुसलमान हे सर्व समाज एकोप्याने राहत होता. आणि आजही एकोप्याने राहतात. या सर्वांचा शेती हा महत्वाचा आणि पहिल्यापासून आज अखेर पर्यंतचा व्यवसाय होता व आहे.

सोळाव्या शतकाच्या अखेरीस आपला महाराष्ट्रांत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा घाट घातला त्यांनी आपल्या विश्वासू मावळयांच्या सहाय्याने मोंगल बादशहा औरंगजेब याला जेरीस आणले. इकडे विजापूरच्या आदिलशहाने आपल्या सेनापतीला छत्रपती शिवाजी महाराजांना पायबंद घालणेसाठी सैन्यासह पाठविले. तो सेनापती पन्हाळ गडला जाण्यासाठी विजापूरहून निघाला मजल दर मजल करत त्याचा मुक्काम वसंतपूर म्हणजे सध्याचे वसगडे गावी पडला.

त्याचवेळी पावसाळा सुरु झाला त्यामुळे सैन्यांचा मुक्काम बरेच दिवस या गावी होता. त्यांच्या मुक्कामादरम्यान आदिलशहाचे सैन्य विलासी असल्याने गाण्या बजावण्याच्या बैठकी भोजनाच्या पंगती सारख्या सुरु होत. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार पैसा गाण्याच्या मैफली ऐकण्यास मिळत असत. तसेच लोकांना रोजगार भरपूर मिळत होता. त्यामुळे लोकांची चंगळ होत होती. व सैन्याच्या मुक्कामामुळे वसंतपूरला एखादया यात्रेचे रुप आले होते.

चार पाच महिन्यांनी सैन्याचा मुक्काम हालून ते सर्व सैन्य पन्हाळगडाकडे रवाना झाल्यानंतर गाव ओसाड व भकास वाटू लागले. तेव्हापासून या गावाचे नाव वसंतपूर बदलून वसगडे झाले.